पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कला संस्कृतीचे लोकनृत्य ( Folk Dance of Tribal Art Culture ) तारपा नृत्यप्रकार सध्या प्रचंड गाजत ( Tarpa dance form is very popular nowadays ) असल्याने तारपा नृत्याला सुगीचे दिवस ( Harvest days for Tarpa dance ) आले आहेत. तारपा वाजवण्याच्या कलेमुळे वडिलांना मिळणारा सन्मान बघून आज त्यांचा मुलगाही हे वाद्य शिकण्यास उत्सुक आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी यूट्यूब कलाकारांनी तारपा नृत्य प्रकाराला विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले आहे. तारपाचा स्वर मन झिंगायला लावतो. तरुण पिढी डिजे, डॉल्बी कडे न वळता तारपाच्या सुरात ठेका धरून सण उत्सव आणि महोत्सवात छाप पाडू लागली आहे. तारपा मुळे तारपावादकाचंही विशेष कौतुक होत आहे. त्यामुळे तारपा आदिवासी कलावंतांना नवी संधी आहे.
यूथ फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या लोकनृत्य स्पर्धेत महाराष्ट्रातले कोणते लोकनृत्य सादर करावे ? महाराष्ट्रात आलेल्या राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी पारंपारिक संस्कृती साठी तारपा समूह नृत्यला फर्माईश असते. तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर मोठ्या प्रमाणात टिकून आहे. पालघर ठाणे जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेली तारपा नृत्यकलेत युवा पिढी भारावलेले दिसते. तारपा वाजविणाऱ्यांची आज नवी पिढी गावाने जपली आहे. तारपा जिंवत ठेवण्यासाठी वाद्य बनविण्यापासून ते वाजविण्यापर्यंतचे कौशल्य नव्या पिढीने आत्मसात करायला सुरुवात केली आहे.
आदिवासी कलाकांरांना लोकनृत्याच्या माध्यमातून मंच उपलब्ध : भारतातील अनेक महोत्सवांमध्ये तारपा ही आदिवासी वाद्य कला आतापर्यंत असंख्यवेळा सादर केली आहे. सर्वात लोकप्रिय ठरत असलेले तारपा लोकनृत्य सांस्कृतिक महोत्सव, उत्सव, उद्घाटने, राष्ट्रपती, मंत्री, आदी निमंत्रित पाहुण्याना सादर करण्यासाठी येथील आदिवासी कलाकांरांना लोकनृत्याच्या माध्यमातून मंच उपलब्ध होऊ लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तारपा सादर करण्यासाठी कलाकार सहभाग घेत आहेत.
तारपा समूहनृत्य डीजे संस्कृतीला पर्याय : आवाज वाढव डीजेच्या ठेक्यापेक्षा आदिवासी संस्कृतीचे तारपा नृत्य अन् वाद्य सुर दरदरून अंगांत भिणते. कोणतेही शब्द नसलेला हा नाच केवळ तारपा या एका वाद्याच्या साथीनं केला जातो. हातात हात घालून केलेला फेर, ताल, लय आणि तारपाच्या सुरावर होणारे तारपा समूहनृत्य डीजे संस्कृतीला पर्याय ठरला आहे. आदिवासी कलावंत लोकसंस्कृतीतील तारपा ही वाद्य कला उराशी कवटाळून आहेत. काळानुरूप रूढी परंपरामध्येही बदल झाले. मात्र, आजही लोक कला जशीच्या तशी प्रतिबिंब रूपाने ग्रामीण लोकजीवनावर उमटलेली दिसते. अगदी शालेय वयात जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, विद्यालय, महाविद्यालयातील मुलं पारंपारिक तारपा नृत्य वैभव डोळ्यांचे पारणे फेडतात. आदिवासींच्या सण-उत्सवात समूह नृत्य करताना आदिवासींना ठेका धरायला लावणारी तारपा, डाका, पावरी अन् बिरी चिरी ही वाद्ये महत्त्वाची मानली जातात.