पालघर - वाडा तालुक्यातील निंबवली गावातील नागरिकांनी विविध मागण्याचे वाडा प्रांतधिकारी अर्चना कदम व वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांना निवेदन दिले. भाजप किसान मोर्चाचे पालघर जिल्हा अध्यक्ष कृष्णा भोईर व माजी सभापती अरूण गोंड यांच्या उपस्थित नागरिकांनी हे निवेदन दिले.
वाडा तालुक्यातील निंबवली भागातून पनवेल-मुंबई-बडोदा या एक्सप्रेस महामार्ग जात आहे. या महामार्गामुळे निंबवलीतील 49 घरे बाधीत होणार आहेत. त्यामुळे निंबवली गावात महसुली खात्याची राखीव असलेली 7.28 हेक्टर जमीनीपैकी 2 हेक्टर जागा गावठाणासाठी देण्यात यावी, अशी 2013 पासून मागणी आहे. ती पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच गोराड-धोदडे पाडा या रस्त्याचे डांबरीकरण करावे, निंबवली येथे आरोग्य केंद्रात कायम स्वरूपी डॉक्टर नेमावा, आरोग्य केंद्रात कायम रुग्णांसाठी गाडी उपलब्ध करून द्यावी, याबरोबर आणखी काही मागण्यांचे निवेदन वाडा तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, वाडा पोलीस ठाण्याला देण्यात आल्याचे किसान मोर्चाचे कृष्णा भोईर यांनी सांगितले.