पालघर - पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. दुर्देवाने या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली.
हेही वाचा - सूर्या धरणाच्या जुन्या पाईपलाईनला गळती; हजारो लीटर पाणी वाया
सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण
पालघरमधील सफाळे येथील दारशेत, टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हे बाळ जन्माला आल्यानंतर 12 तासाने त्याची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
उपचारासाठी फरफट
बालकावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तेथे लहान बालकांसाठी कोणतीही आरोग्य सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे, कोरोना लागण झालेल्या या बाळाला उपचारासाठी वणवण करावी लागली. उपचारासाठी अनेक तासांची फरफट झाल्यानंतर बालकाला जव्हार येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस बाळाची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे, त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले सहा दिवस हे बाळ मारणाशी झुंज देत होते. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली. 5 जून सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा - कंटेनर व मिक्सरच्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू