पालघर - मुस्लिम समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का-मदिना येथील हज यात्रेसाठी केरळमधील मलप्पुरम शहरातील एक मुस्लिम युवक शिहाब छोटूर वय ३९ वर्ष हा पायी प्रवास करीत निघाला आहे. त्याचे आगमन पालघर तालुक्यातील मनोर येथे होताच मस्तान नाका येथे शेंकडों मुस्लिम बांधवाकडून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
केरळ येथील मलप्पुरम शहरातून मक्केचा पायी प्रवास - शिहाबने आपल्या मक्का-मदीना हज पदयात्रेबद्दल माहिती देताना सांगितले, मी केरळ येथून मलप्पुरम शहरातून मक्केचा पायी प्रवास सुरू केला आहे. केरळ ते मक्का हे प्रवास अंतर ८,६४० किमी आहे. मला मक्का येथे पायी जाण्यासाठी 280 दिवस लागणार आहेत. दररोज मी 25 ते 35 किलोमीटर चालण्याचा विचार केला आहे. माझी भोजनाची व निवासाची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी मशिदीकडून केली जात आहे. पुढील हज यात्रेसाठी वेळेवर मक्केला पोहोचणे हे आपले ध्येय असून पाच देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याकडे व्हिसा असून पुढील वर्षी सौदी अरेबियाला पोहोचल्यानंतर हज यात्रेसाठी अर्ज करणार असल्याचे शिहाबने सांगितले. तसेच मनोर येथून गुजरातला पायी चालत तेथून पंजाब मधील वाघा बॉर्डरवरून पाकिस्तान, इराण, आणि कुवेत मध्ये प्रवेश करून २८० दिवसांच्या पायवाटेनंतर पुढील वर्षी सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी पोहोचेल असेही शीहाबने सांगितले.