पालघर - वसई-विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्याच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आपण स्वेच्छेने पद सोडले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळकटी देण्याचे काम करणार आहे. महापौर पदासाठी सर्वसाधारण वर्गातून अनुभवी असलेल्यांना संधी मिळावी, अशीही आपली इच्छा असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
याच वर्षी पालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रवीणा ठाकूर यांना महापौरपदाची धुरा देण्यात आली होती. यानंतर हे पद सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाल्यानंतरही अनुसूचित जातीतील रुपेश जाधव यांना महापौर पदावर बसविण्यात आले. मात्र, अवघ्या एका वर्षातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे दिला.
नालासोपारा मतदारसंघात राजकारण तापले -
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे शिवसेनचे उमेदवार असतील. या चर्चेमुळे येथील राजकारण तापले आहे. शिवसेना आपली पूर्ण ताकद प्रदीप शर्मा यांच्या पाठीशी उभी करण्याचे संकेत मिळू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी पिछाडीवर होती. शिवसेनेने जर शर्मांना नालासोपारा येथून तिकीट दिले तर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.