पालघर - कोरोना संक्रमणाचा सामना समाजातील सर्वच घटकांना करावा लागत आहे. या काळात अनेकांचे रोजगार गेले असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, कोरोना संकटाची संधी करून पालघर जिल्ह्यातील खेड्यापाड्यात उमेद अभियानामार्फत महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. शिलाईयंत्राद्वारे लाखो मास्क तयार करून अडचणीच्या काळात महिला बचत गटांना यामुळे आर्थिक स्रोत मिळाला आहे.
उमेद अभियानतंर्गत पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये मास्क उत्पादन केले जात आहे. बचत गटांमार्फत सुमारे 2 लाख मास्कचे उत्पादन झाले असून, 1.50 लाखापर्यंत मास्कची विक्री झाली आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पालघर जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यामध्ये समुहामार्फत गरीबातील गरीब कुटुंबांना जोखीम प्रवर्ग निधिमधून सुमारे 11.50 लाख इतका निधी वितरीत झाला आहे. त्यामुळे त्या सर्व कुटुंबाना, विधवा, परितक्ता व वंचित घटकांना याचा खुप मोठा आधार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी केलेले कार्य हे खेड्यापाड्यातील महिलांसाठी नक्कीच एक नवी दिशा देणारे आहे.