पालघर - सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या केळवा सागरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, 6 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी बनावटीची बंदूक, २ जिवंत काडतूसे, मोबाईल, दोन मोटारसायकल असा ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजवर कोळंबी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे घडले असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गटारी अमावस्या असल्याने विषेत: मासांहार करण्यासाठी कोळंबी व मच्छी चोरीचे प्रकार या भागात मोठ्या प्रमाणात घडतात. या पार्श्वभूमीवर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यासाठी केळवा पोलीस ठाण्याचे प्रभारी मानसिंग पाटील यांनी केळवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी वेषांतर केलेले पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांना मार्गदर्शन करून कारवाई करत वेगवेगळी पथके तयार केली. १९ जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास टेंभीखोडावे रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी महेंद्र नायको भोईर (वय ३५) याने आपल्या हातातील काडतूस रोडच्या बाजूला फेकताना पथकाच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता आपले साथीदार हे टेंभीखोडावे गावच्या जुन्या जेटीवर बंदूक घेऊन बसले आहेत. मी त्यांच्याकडे काडतुसे घेऊन जात असून, तेथून आम्ही पुढचे काम करणार असल्याची माहिती या आरोपींनी दिली.
पोलिसांचे पथक टेंभीखोडावे येथील जुन्या जेटीवर गेले असता तेथे अंधारात सहा ते सात जणांची कुजबुज ऐकू आली. याठिकाणी पथकाने सापळा रचून बाळू विष्णू पाटील (वय २९), शिवदास नायको पाटील (वय ३६), दिनेश विष्णू पाटील (वय ४५), दहेश अनंत गावड (वय ३२), नितीन शांताराम पाटील (वय ३५), महेंद्र नायको भोईर (वय ३५) अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. तर यापैकी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.अटक केलेल्या आरोपीच्या ताब्यातून १२० सेमी लांबीची लाकडी व लोखंडी बॅरेल असलेली गावठी बनावटीची बंदूक, दोन जिवंत काडतूस, मोबाईल, दोन मोटारसायकल असा ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींविरोधात केळवा सागरी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३९९, ४०२ आर्म्स ॲक्ट कलम ३, २५, (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.