पालघर - जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून अजूनही पावसाची हजेरी कायम आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी असून पश्चिम किनारपट्टी भागात देखील पावसाला सुरुवात झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील मनोर, कासा आदी ठिकाणांसह पूर्व भागात पावसाने रात्रीपासूनच दमदार हजेरी लावली असून पालघर, बोईसर, सफाळे, केळवे या पश्चिम भागात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पावसाळा आगमनाने सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पाऊस सुरू झाल्याने बाहेर निघालेल्या चाकरमान्यांची काहीशी तारांबळ उडाली असून शेतकरी वर्गाला मात्र दिलासा मिळाला आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर ग्रामीण भागातील नदी, नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत. पुढील दोन दिवसात पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद! 25 वर्षीय तरूणाने कोरोनावर मात करत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा