पालघर - जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोगरा उत्पादन केले जाते. येथील मोगरा कळी व फुलाला दादर, नाशिक, कल्याण येथील फुल बाजारात मोठी मागणी आहे. सध्या लग्नसराई सुरू झाली असून मंदिरेही उघडली आहेत. त्यामुळे मोगरा कळी व फुलांना चांगला भाव आहे. मात्र, नेमक्या याचवेळी मोगऱ्यावर पिन बोरर रोगामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
कोरोना काळात देखील मोगरा उत्पादकांना फटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे शेतीवर गदा आली. ज्यात मंदिरे, बाजारपेठा, लग्न सराई संचारबंदीत सापडल्याने फुलशेतीवर कुऱ्हाड कोसळली आहे. मोगरा उत्पादक रातोरात बेरोजगार झाला होता.
मोगऱ्यावर पिन बोरर रोगाचा प्रादुर्भाव
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यात मोगरा उत्पादन घेतले जाते. एकट्या विक्रमगड तालुक्यातील जवळपास 50 गावांतील एक हजार ते बाराशे शेतकरी मोगरा उत्पादन घेत असतात. टाळेबंदीच्या काळात मोगऱ्याला उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनलॉकनंतर या हंगामात लग्नसराई तसेच मंदिरे व विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने मोगऱ्याच्या कळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. प्रतिकिलो भाव बाराशे ते पंधराशे रुपयांवर गेला आहे. त्यामुळे या हंगामात मोगरा कळ्यांचे मोठे उत्पादन घेण्याच्या तयारीत शेतकरी असताना थंडी सुरू झाल्याने तसेच कळ्यांवर पिन बोरर (मोगरा कळी तयार होण्याचा कालावधी दरम्यान मोगरा कळीमधे लहान शेंद्री अळ्या तयार होऊन पूर्ण पिक वाया जाते) या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे. या चालू हंगामात मोगरा कळ्यांचे उत्पादन घेण्याच्या तयारीत पिन बोरर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भाव वाढले. पण, उत्पादन घटल्याने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
काय उपाययोजना कराव्यात
पिन बोरर रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी, बागेत साफसफाई ठेऊन, किडीच्या फुलांचा नायनाट करणे, निम तेलाचा वापर करणे, वेगवेगळ्या कीटकनाशकाचा वापर करून, प्रकाश साफळ्याचा वापर करणे, अशा पद्धतीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावा. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन पिक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी केले आहे.
हेही वाचा - अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक, तर 80 लाखांचा मुद्देमाल जप्त
हेही वाचा - वसईत केमीकल व प्लॅस्टीक कंपनीला आग, आगीत आठ गाळे जळून खाक