पालघर: आयुष्यात जीवन जगताना अनेकांना संकटांना भिडण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागतो. बळकट शरीर, कणखर मन आणि सक्षम आर्थिक परिस्थिती असणारे अनेकजण मात्र एखाद्या संकटानेच खचून जातात, निराश होतात आणि आयुष्याची आस सोडतात. दुसरीकडे मात्र काहीजण अपंगत्व, हलाखीची परिस्थिती आणि इतर अनेक समस्यांशी झुंज देत यशस्वी मार्गक्रमण करतात. आव्हानात्मक आयुष्याशी संघर्ष करत फुलण्याचा प्रयत्न करणारा ‘वसंत’ या तरूणाची संघर्षमय कहाणी.
वसंतची संघर्षमय कथा: वसंत सुरेश रावते असे त्याचे पूर्ण नाव. हा 27 वर्षीय तरुण पालघर तालुक्यातील नंडोरेच्या बालशीपाडा येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात चार सदस्य असून, परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एवढीच त्याची ओळख नाही, तर दोन हात आणि एक पाय नसतानाही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चाललेला संघर्ष हीच त्याची खरी ओळख आहे.
पायानेच करतोय दैनंदिन काम : दिव्यांग असलेला वसंत जेवण, पाणी पिणे इत्यादी सर्व कामे पायाच्या साहाय्यानेच करतो. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, अत्यंत संघर्ष करत त्याने हा टप्पा गाठला आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्याने बालशीपाडा येथे घेतले. पाचवी ते सातवीपर्यंत घोलविरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत तो एका पायावर उड्या मारत जात होता. सातवीपर्यंत त्याने असा खडतर प्रवास केला. त्यानंतर पालघर येथील जीवन विकास शाळेत त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
कृत्रीम हात व पाय: शाळेलगत राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याचे रिक्षा भाडे भरल्याने त्याला आधार झाला. यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापकांनीही खूप मदत केली. एवढेच नव्हे तर बाबा कदम आणि वागेश कदम यांनी परीक्षा शुल्क माफ करून दिले, असे वसंतने सांगितले. दरम्यानच्या काळात वसई विरारचे प्रथम महापौर राजीवनाना पाटील यांनी त्याला कृत्रीम हात आणि पाय बसवून चालते केले. याशिवाय गजानन गिरी यांनीही त्याला मोठी मदत केली. शाळेत असताना ते दर दोन दिवासांनी चेंबूर येथे तपासणीसाठी घेऊन जात असत, असे वसंतने सांगितले.
जिद्दीने शैक्षणिक वाटचाल करतोय : अपंगत्वावर मात करत नियमितपणे शाळा आणि अभ्यासाच्या बळावर त्याने दहावीच्या परीक्षेत 53.40 टक्के गुण मिळविले. शारीरिक दौर्बल्य आणि अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती अशा दुहेरी संकटातही खचून न जाता त्याने जिद्दीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व पेपर पायाने लिहिले. गावातील सर्व मित्र माझी बॅग नेणे-आणणे, तसेच इतर प्रकारची मदत करतात. बारावीला असताना बाहेरच्या मित्रांनीही खूप मदत केली, असे वसंतने आवर्जून सांगितले.
वसंतला हवा आहे मदतीचा हात: शिक्षणासाठी परिस्थितीशी लढा दिलेला वसंत आता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी झुंज देत आहे. सध्या तो गणेशनगर येथील माथाडी कामगार संघटनेच्या कार्यालयात काम करत आहे. सद्यःस्थितीत हालअपेष्टा सहन करत तो आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करत आहे. एखादा व्यवसाय सुरू करून कुटुंबाचा चरितार्थ चालवता यावा, यासाठी शासनाच्या मदतीची त्याला अपेक्षा आहे. दिव्यांग वसंतने जिद्दीच्या बळावर वाटचाल केली असून, आता त्याला पायावर उभे राहण्यासाठी शासनाच्या मदतीची आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीची खरी गरज आहे. अशी साथ आणि मदतीचा हात मिळाला तर त्याला जीवनात निश्चितच स्थिरावता येईल.