विरार : वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. वसई-विरारकरांनी तातडीची गरज आणि जिव्हाळ्याचा हा विषय असल्याने नालासोपारा पूर्व-पश्चिम (श्रीप्रस्थ) वसई रेंज ऑफिस ते एव्हरशाईन सिटी या भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलांची आत्यंतिक गरज आहे. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या निर्माणाकरता या वर्षी च्या ‘अर्थसंकल्पा`त तरतूद करण्यात यावी, अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.
वाहतुकीचा ताण : वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 12.23 लाख होती. तर सध्याची लोकसंख्या अंदाजे 24 लाख इतकी आहे. मुंबई महानगरालगत येत असल्याने वसई-विरारचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात पश्चिम रेल्वेची विरार, नालासोपारा, वसई रोड नायगाव ही चार रेल्वे स्थानके येतात. पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या अस्तित्वातील रेल्वे उड्डाणपुलांची संख्या खूपच कमी असल्याने या पुलांवर वाहतुकीचा ताण येत आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा ठराव क्र. 13 दि. 16/4/2015 अन्वये नालासोपारा, निळेमोरे येथील ओस्वाल नगरी येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नव्याने उड्डाणपूल विकसित करण्याकामी यापूर्वी महापालिकेने मान्यता दिलेली आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत : महापालिकेच्या प्रस्तावित रिंगरूटला जोडणारा हा प्रमुख उड्डाणपूल असल्याने शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घ्यावी, अशी विनंती तत्कालिन आयुक्त श्री. डी. गंगाथरन यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्तांना दिनांक 22 सप्टेंबर 2021च्या पत्रान्वये केली होती. तर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विरार-विराट नगर येथे नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाबाबत संबंधित विभागास निर्देश द्यावेत, अशी विनंती विद्यमान आयुक्त अनिलकुमार पवार यांनी तत्कालिन पालकमंत्री दादाजी भुसे यांना केलेली होती.
निधी अभावी कामे रखडली : या उड्डाणपुलाचा संदर्भ देताना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी 30 एप्रिल 2022 च्या वसई-विरार विकासकामांच्या केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान; विरार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव या चार ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांच्या कामाकरता स्वत: पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली होती. या कामाकरता मोठा निधी लागणार असल्याने ही कामे अद्याप प्रस्तावित आहेत. मात्र वसई-विरारकरांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय स्तरावर या कामांकरता पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही तत्कालिन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी त्या वेळी दिली होती.
अर्थसंकल्पात तरतूद कारा : या बाबींची आठवण करून देतानाच; राज्यातील स्थित्यंतरे आणि अन्य कारणे पाहता या उड्डाणपुलांच्या कामाचा मार्ग सुकर होईल, असे सध्या तरी दृष्टिपथात नसल्याची खंत माजी विधानसभा सदस्य विवेकभाऊ पंडित यांनी व्यक्त केली आहे. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध समाजोपयोगी कामे होती घेण्यात आलेली आहेत. कोट्यवधी रुपये शहर सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात येत आहेत. मात्र, वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. वसई-विरारकरांनी तातडीची गरज आणि जिव्हाळ्याचा हा विषय असल्याने नालासोपारा पूर्व-पश्चिम (श्रीप्रस्थ) वसई रेंज ऑफिस ते एव्हरशाईन सिटी या भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलांची आत्यंतिक गरज आहे. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या निर्माणाकरता या वर्षी च्या ‘अर्थसंकल्पा`त तरतूद करण्यात यावी, अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.