पालघर - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी विविध ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी शाळा, कॉलेज व अन्य ठिकाणांचा वापर होत आहे. मात्र या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलेल्या कोरोना संशयितांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सरकारकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा तोकड्या असून यामुळे रुग्णांची गैरसोय वाढली आहे.
विक्रमगड तालुक्यातील शिळ येथे एका संस्थात्मक क्वारंटाइन असलेल्या ठिकाणी रुग्णांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. रुग्णांना सकस आणि पौष्टीक आहार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नातेवाईक करत आहेत. याचसोबत डहाणू तालुक्यातील एका आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींना अस्वच्छतेत वास्तव्य करावे लागत आहे. यासंबंधी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्यक्ती त्यांच्या समस्या मांडताना दिसतात. या ठिकाणी 55 संशयितांना क्वारंटाईन केले आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचारी वर्ग आहे.
या क्वारनटेन ठिकाणी शौचालय अस्वच्छ आणि पोलिसांना येणारे पॅकेट शेअर केले जातात,एखादा पॉझिटिव्ह रूग्ण आढलला तर त्याला उशिरा येथून नेले जाते अशी कैफियत हे क्वारनटेन केलेले रुग्ण या व्हायरल व्हिडीओत मांडताना दिसत आहे. प्राथमिक सुविधांसाठी देखील रुग्णांना झगडावे लागतेय. याबाबत डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पाण्याच्या व्यवस्थेसाठी 20 लिटरचे 13 पाण्याचे कॅन उपलब्ध केल्याची माहिती दिली. तर जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे यांनी संबंधित भागाची पाहाणी करण्यात येईल, असे सांगितले.