पालघर - राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच वाहनचालकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्राला उत्तरेकडील राज्यांशी जोडणाऱ्या पालघरमधील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणीसाठी जवळपास ५ ठिकाणी दहा पथके नेमण्यात आली आहेत. तसेच, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील ५ रेल्वे स्थानकांवर तपासणी पथक तैनात असणार आहेत. या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगनंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला तरच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे. संशयित आढळून आल्यास पुन्हा परत जाण्यास सांगण्यात येईल अथवा पालघर क्वारंटाईन केले जाणार आहे.
हेही वाचा - दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कोरोना तपासणी; महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
रेल्वेसंबंधी नियम -
इतर राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या सर्व यात्रेकरूंनाही आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी सोबत ठेवावा लागेल. जर रेल्वे गाडी या राज्यांतून निघाली असेल किंवा तेथे थांबली असेल तरीही तेथील प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असेल. महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ९६ तास अगोदर कोविड-१९ चाचणीसाठी नमुना दिलेला असावा. ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल नसेल त्यांची कोविड-१९ लक्षणाची तपासणी आणि शरीराचे तापमान नोंदविले जाईल. यात्रेकरूंना कोविड-१९ ची लक्षणे नसतील तर, त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. कोविड-१९ लक्षणे असलेल्या प्रवाशांना वेगळे करून त्यांची अँटीजन टेस्ट घेतली जाईल. ही चाचणी जर निगेटिव्ह आली तर, त्यांना घरी जाण्याची परवानगी असेल. जे प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळतील किंवा चाचणी केलेले नसतील त्यांना कोविड केअर सेंटरला पाठविले जाईल.
रस्ता मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम -
सीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे दिल्ली एनसीआर त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीची आणि शारीरिक तपासणीची खात्री करण्याची व्यवस्था करतील. ज्या प्रवाशांना कोविड-१९ लक्षणे नसतील त्यांना दाखल होण्याची परवानगी असेल. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यांना परत त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्याची संधी दिली जाईल. अथवा त्यांना वेगळे करून अँटीजन टेस्ट घेतल्या जातील. जर ते निगेटिव्ह आले, तर त्यांना पुढे प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. ज्या प्रवाशांनी कोविड-१९ चाचणी केलेली नसेल किंवा जे पॉझिटिव्ह असतील, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल.
हेही वाचा - सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा