विरार : विरार पूर्वेच्या खार्डीकोशिंबे गावात लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या आयोजित कार्यक्रमावर व आयोजकांवर समाज माध्यमांतून टीका केली जात आहे. या सर्व टीकांवर कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी विरोधकांचे हे कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
पाटील यांच्या घरी सत्यनारायण पूजेनिमित्त त्यांनी आयोजन केलेला हा कार्यक्रम त्यांच्या कोसमाई बंगल्यातच होता. याशिवाय हा कार्यक्रम कौटुंबिक मनोरंजनाचा असल्याने त्याचे मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र लावणीस्टार गौतमी पाटील खार्डी गावात येणार असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगल्यानंतर तिला पाहण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाची रितसर परवानगी घेण्यात आली होती व तेथील सुरक्षेसाठी बाउंसरचीही सोय करण्यात आली होती. लावणी कलाकार गौतमी पाटील यांनी आपला तीन तासाचा वेळ दिला होता. मात्र स्वतः कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याने तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढलेली पाहायला होती. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस स्वतः आमच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी उभे होते. मात्र असे असताना प्रसार माध्यमांनी केवळ कार्यक्रमावर टीका करण्यासाठी बातमी प्रसारित केली - प्रभाकर पाटील
समाजमाध्यमांवर गौतमी पाटील हिच्या आडनावावरून कार्यक्रमाच्या आयोजनाच्याच दिवशी वाद निर्माण झाला होता. त्यामुळे विरोधकांनी हा कार्यक्रम व आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. एकीकडे टीका होत असताना दुसरीकडे उत्साह दिसून येत होता. गौतमी पाटील गावात येणार म्हणून आजूबाजूच्या गावातील हजारो ग्रामस्थांनी प्रभाकर पाटील यांच्या घरी पूजेला व कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पहिल्यांदाच अशा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. हा कार्यक्रम चांगला झाल्याचे देखील मला अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर होणाऱ्या टिकेपेक्षा ग्रामसथांच्या आनंदासाठी आणखीन एक कार्यक्रम ठेवायचा विचार करत असल्याचे सांगून पाटील यांनी विरोधकांना चांगलेचं टोचले आहे.
हेही वाचा...