पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणी सीआयडीने आणखी 5 जणांना अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या 120 झाली असून, यापैकी 9 आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. शुक्रवारी नव्याने अटक करण्यात आलेल्या या 5 आरोपींना आज डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात कासा पोलिसांनी याआधी 115 आरोपींना अटक केली असून, यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर गाजले असून हे प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी गडचिंचले येथे घटनास्थळी भेट दिली आणि पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनाही राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीमार्फत सुरू आहे.