ठाणे - काल्हेर गावच्या भाजप शाखा सचिवाचा वसई तालुक्यातील वैतरणा रेल्वे स्थानकानजीक मालगाडीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. सूर्यकांत केसरीनाथ पाटील ( वय ५५ रा. बांगरनगर ,काल्हेर ) असे त्यांचे नाव असून ते भिवंडी तालुक्यातील मौजे काल्हेर गावचे भाजप शाखा सचिव होते. पाटील यांच्या मृत्युमुळे काल्हेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - आयसीसीच्या क्रमवारीत कोहली-बुमराहचे राज्य, तर शाकिबला मोठा 'धक्का'
सूर्यकांत पाटील हे आज सकाळी वैतरणा येथील बहिणीच्या घरी निघाले होते. पाटील यांनी त्यांची गाडी चिंचोटी येथील भजन सन्स डेरी येथे पार्क करून ते नायगाव स्थानकावरून रेल्वेने गेले होते. वैतरणा रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून उतरून ते प्लॅटफार्म ओलांडत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या मालगाडीची त्यांना जोरदार धडक लागली. त्यात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
मालगाडीच्या मोटारमनने विरार रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या अपघाताची नोंद केली आहे. सूर्यकांत यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा, २ मुली, २ भाऊ असा परिवार आहे. त्यांनी यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देखील उभारला होता. आज सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.