पालघर - राज्यात 21 सप्टेंबरला विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता पथकामार्फत मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहिता पथक आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्यामार्फत सुमारे साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम, 54 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या धोरणाला उदित रांज यांचा विरोध
यासोबतच 14 कोटी 15 लाख रुपयांचे अमली पदार्थ तसेच 29 लाख रुपयांची इतर मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर सी-व्हिजील या अॅपवर 95 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामधील 15 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यात 18 अग्निशस्त्रे व 134 काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून पालघर विधानसभेतील 1 तर वसई विधानसभेतील 7 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.