उस्मानाबाद - जागतिक एड्स दिनानिमित्त ईटीव्ही भारतने एचआयव्हीग्रस्त महिलेची प्रतिक्रिया घेतली आहे. एचआयव्ही हा आजार जडल्यानंतर आयुष्य संपून जात नाही. खचून न जाता धैर्याने आयुष्याला सुरुवात करा. सर्वसामान्यांप्रमाणेच तुम्ही तुमचे आयुष्य जगू शकता, असे या महिलेने सर्वांना आवाहन केले आहे.
एआरटी केंद्रात नोंद झालेल्या रुग्णांची संख्या
उस्मानाबाद जिल्ह्यात 2006 ते 2019 या पंधरा वर्षाच्या काळात 7 हजार 749 एचआयव्हीग्रस्त रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी 3 हजार 526 रुग्ण नियमित जिल्हा रुग्णालयात येऊन उपचार घेत आहेत. यातील काही रुग्णांचे वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. रुग्णांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. हे सर्वच रुग्ण जिल्हा रुग्णालयातील एआरटी औषध घेऊन आपले आयुष्य सामान्य व्यक्तीप्रमाणे जगत आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून या रुग्णांना वेगवेगळ्या सोयी सुविधाही पुरवल्या जात आहेत. रुग्णांची ओळख पटेल, अशी माहिती कोणालाही दिली जात नाही. दररोज सुमारे दीडशे रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येतात.
विहान या सामाजिक संस्थेमार्फत रूग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी होत आहेत प्रयत्न
जिल्ह्यात नोंद असलेल्या 7 हजार 749 रुग्णांपैकी 4 हजार 226 रुग्ण उपचार घेत नाहीत. यातील काही रुग्ण मरण पावले आहेत. तर काही रुग्ण हे गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे आणि नातेवाईकांच्या भीतीपोटी जिल्हा रुग्णालयात येऊन औषध उपचार घेत नाहीत. ते आपली ओळख लपवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याला जडलेला आजार हा नातेवाईकांना समजेल, अशी भीती रुग्णांच्या मनात असते. त्यामुळेच हे रुग्ण जिल्हा रुग्णालयात येऊन औषधोपचार घेत नसल्याचे विहान संस्थेचे रवी संगमकर यांनी सांगितले. विहान ही संस्था जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्त रुग्णांना वेगवेगळ्या जिल्हास्तरीय शासकीय योजनांची माहिती देते. या योजनांचा रुग्णांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. जिल्ह्यातील रुग्णांना शेळीपालन, निराधार संजय गांधी योजना, घरकुल योजना, जिल्हा रुग्णालयात येऊन औषध घेण्यासाठी एक दिवसाचा मोफत बस प्रवास रुग्णांना देण्यासाठी ही संस्था पुढाकार घेते. महिला रुग्णांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत केली जाते.
पती-पत्नी दोघांनाही एच.आय. व्ही. त्यांची अपत्ये मात्र या आजारापासून दूर
पती-पत्नी दोघांनाही एचआयव्ही असेल, महिला गरोदर असेल तर होणाऱ्या अपत्यांना देखील एचआयव्ही होण्याची शक्यता असते. मात्र योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास होणारे अपत्य हे सदृढ, सक्षम आणि एचआयव्ही मुक्त जन्माला येते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाकडून औषधे आणि कंडोमची मागणी
उस्मानाबाद जिल्ह्यातून एका वर्षात सुमारे 60 हजार कंडोमची मागणी केली जाते. जिल्ह्याला गरजेपेक्षा जास्त म्हणजेच 70 हजार कंडोम पुरवले जात असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महादेव शिनगारे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयातून 56 हजार कंडोमचा खप होतो. रुग्णांसाठी ए.आर.टी. औषधांचा मागणीनुसार पुरवठा केला जातो, असे अधिकारी सांगतात.
कसा होतो एच.आय.व्ही.-एड्स...?
एचआयव्ही होण्याची विविध कारणे आहेत. याचा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंधातून होतो. तसेच एचआयव्ही दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला होतो. एचआयव्ही या आजाराची लागण झाल्यानंतर वेगवेगळे आजार जडतात. भूक मंदावणे, वारंवार वजन कमी होणे, मेंदू बाधित होणे, त्वचा रोग जडणे, यकृत खराब होणे असे वेगवेगळे आजार जडतात. एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर याची लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत मात्र, साधारण वर्षभरानंतर हळूहळू वजन घटण्यास सुरुवात होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी दिली.
एचआयव्हीची लागण झाल्यानंतरही योग्य औषधोपचारांच्या सहाय्याने रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.