उस्मानाबाद- मुरुड येथे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याने, त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व वारंवार त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्यांची नावे आपल्या हातावर गोंदवले आहे. मात्र अद्यापही या वृद्धांना न्याय मिळालेला नाही. विश्वनाथ मस्के आणि विमल मस्के असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव असून, ते लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे वास्तव्यास आहेत.
या वृद्ध दाम्पत्याच्या मालकीची जमीन कळंब तालुक्यातील नायगाव शिवारामध्ये आहे. याच जमिनीच्या वादातून हे भांडण सुरू असून, त्यांना यापूर्वी देखील जबर मारहाण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील काही लोकांकडून आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आम्हाला जिवे मारण्याची धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप या वृद्ध दाम्पत्याने केला आहे. मात्र आमची दखल कोणीच घेत नसल्याने आम्ही त्यांची नावे हातावर गोंदवल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप
यामध्ये नायगाव येथील व्यंकट रामभाऊ माळी, सुनील व्यंकट माळी आणि विजय व्यंकट माळी यांच्या नावाचा उल्लेख आहे. हे तिघे मिळून माला मारणार आहेत. माझी हत्या झाल्यास या तिघांनाच जबाबदार धरावे असं या वृद्धाने आपल्या हातावर गोंदवले आहे.त्याचबरोबर या तिघांनी मिळून गेल्या काही वर्षात माझ्या शेताचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतातील ठिबक सिंचनसह ऊस आणि सोयाबीनचे पीक पेटवून दिले. या विरोधात मी अनेकवेळा शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नाही, उलट मलाच दमदाटी करण्यात येते असा आरोपही या वृद्धाने केला आहे. त्यामुळे या लोकांवर कारवाई करावी यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले मात्र, सोमवारी गावातील लोकांनी माझा ऊस जाळून टाकला अशी व्याथा या वृद्धाने मांडली आहे.
वारंवार शेतीचे नुकसान करत असल्याचा आरोप
नायगावमध्ये गट क्रमांक 449 मध्ये असलेल्या आपल्या शेतात विश्वनाथ मस्के यांनी उसाची लागवड केली होती. या उसाची सध्या तोडणी सुरू आहे. दोन एकर उसाची तोडणी पुर्ण झाली. उर्वरित उसाची तोडणी सुरू होती, मात्र सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिल्याने एक एकर वरील ऊस जळून खाक झाला आहे. तर 19 सप्टेंबरला मस्के यांनी आपल्या शेतात काढून ठेवलेलं सोयाबीन पेटवून देण्यात आले होते.