उस्मानाबाद - केंद्र सरकारने शेतकरी व कामगारच्या संदर्भात पास केलेल्या विधेयकावरून जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आज आंदोलन करत शहरातील मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना या कायद्या बाबत जनजागृती करून कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यापूर्वी देखील काँग्रेसच्यावतीने या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात आता जिल्ह्यातील काँग्रेस विरोध दर्शवण्यासाठी जागरुक झाली आहे. शेतकऱ्यांना या कायद्याच्या संदर्भात माहिती देऊन या कायद्याला शेतकऱ्यांचाच विरोध आहे, हे दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 2 लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेण्यात येणार आहे. हे निवेदन राष्ट्रपती व महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीकडे सुपर्त करणार असल्याचे कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरण पाटील, विश्वास शिंदे, अग्निवेश शिंदे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.