उस्मानाबाद - मराठवाड्याच्या सीमेवरील परांडा तालुक्यातील भांडगाव कायम दुष्काळाच्या छायेत असते. मात्र, या गावाने रब्बी व खरीप हंगामाची पीक कायम संकटात आल्यामुळे यावर एक नवीन मार्ग शोधला आहे. संपूर्ण गावाने शिवारात फक्त गाजराचे पीक लावले आहे. त्यामुळे या भांडगावची ओळख आता गाजराचे गाव अशी होत आहे.
भांडगावच्या भोसले कुटुंबाची ४ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात १ एकर गाजर लावली आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी सर्व खर्च जाऊन २ ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. भोसले पिढ्यानपिढ्या गाजराची शेती करत आहे. हे पीक त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे.
या गावातील गाजरे प्रसिद्ध आहेत. या गावात रासायनिक खत न वापरता गाजरे पिकवली जातात. त्यांचे बी शेतातच तयार केले जाते. त्यानंतर शेतकरी त्याची लागवड करून ते शेतासमोर किंवा घरासमोर विक्री करतात. हे गाजर खरेदी करण्यासाठी लोकही आवर्जून भांडगावमध्ये येतात.