नाशिक - आई या मायेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना देवळा तालुक्यातील वासोळा गावात समोर आली आहे. येथील एका अज्ञात मातेने नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या जीवंत अर्भकाला कपड्यांमध्ये गुंडाळून फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अर्भकाला एका कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी अवस्थेत रडताना आढळून आले.
वासोळ येथील आदिवासी वस्तीत स्त्री जातीचे नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आले होते. याबाबतची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एका पडक्या वस्तीमध्ये हे अर्भक टाकण्यात आले होते. यातील गंभीर बाब म्हणजे बाळाची नाळ सुद्धा कापली गेलेली नव्हती आणि निर्जनस्थळ असल्याने एका भटक्या कुत्र्याने देखील या बाळाच्या डाव्या पायाला चावा घेतला होता. त्यामुळे हे बाळ जखमी अवस्थेत आढळून आले आहे.
देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू....
जखमी अवस्थेत कापडात गुंडाळलेले अर्भकाला ग्रामस्थांनी ताब्यात घेत त्याला तत्काळ उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. केवळ मुलगी जन्माला आली म्हणून नकोशी असलेल्या या स्त्री अर्भकाला फेकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे..