येवला (नाशिक) - येवला येथील रहिवासी असलेले विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा अहवाल पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबई येथे चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. तसेच कुटुंबातील सदस्यांसोबतही घडले. त्यामुळे लॅबचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
आमदार नरेंद्र दराडे कार्यकर्त्यांच्या व नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कुठलीही लक्षणे नसताना त्यांनी शंका म्हणून तपासणी केली. त्यावेळी प्रवरा येथील खासगी लॅबमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या घरातील आणि संपर्कातील २४ जणांचे आरोग्य विभागामार्फत स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंब हादरले होते. मात्र, कोरोनाची लक्षणे नसल्याने परत खासगी लॅबकडून चाचणी करण्यात आली. त्यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, पहिल्या अहवालात पॉझिटिव्ह आल्याने आमदार दराडे मुंबईतील फोरटीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मात्र, तेथील आरोग्य यंत्रणेला या अहवालावर विश्वास बसेना. त्यामुळे त्यांनी परत आमदार दराडेंचे स्वॅब घेऊन चाचणी केली. त्यावेळी ते निगेटिव्ह आले. त्यामुळे दराडेंना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे समर्थकांनी फटाके फोडत एकच जल्लोष साजरा केला. मात्र, एका लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या लॅबचा निगेटिव्ह आल्याने कोरोना अहवालाचा गोंधळ समोर आला आहे. याबाबत आमदार नरेंद्र दराडे यांचे भाऊ आमदार किशोर दराडे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.