नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर श्रावणातही बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्र्यंबकेश्वर स्थानिक प्रशासनाने 28 जुलैपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे श्रावणातही त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात 8 हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर 390 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शासनाने सुद्धा अद्याप धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने 28 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहे. त्यामुळे श्रावणात देखील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.
मंदिरात मात्र नित्यकाल पूजा सुरू
त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी, मंदिरात नेहमीच्या परंपरेच्या पूजा सुरू आहे. यात अभिषेक, धूप, दीप, नैवेद्य यांसह सायंकाळी आरती होते. आषाढी पौर्णिमेपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे दरवर्षी हा परिसर गजबजून जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे भाविक नसल्याने त्र्यंबकेश्वरमधील व्यवहार व उलाढाल ठप्प झाले आहे.
त्र्यंबकेश्वर भागात 9 प्रतिबंधित क्षेत्र
त्र्यंबकेश्वरमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे या भागात सध्या 9 प्रतिबंधक क्षेत्र आहेत.
त्र्यंबकेश्वर मधील लाखोंची आर्थिक उलाढाल ठप्प
दरवर्षी श्रावण महिन्यात देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. खास करून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते.
यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी आर्थिक उलाढात होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे सर्व उलाढाल ठप्प आहे. यामुळे येथील आर्थिक चक्र थांबले आहे.