नाशिक - तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारून भगवान शंकराप्रति आपली श्रद्धा अर्पण केली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर महादेव मंदिरात आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 'बम बम भोले च्या गजराने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेली आहे.
पहाटे चार वाजता त्रंबक राजाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविकांकडून जय भोलेचा गजर होत असल्याने त्र्यंबकेश्वर परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होत असल्याने ब्रह्मगिरी पर्वताच्या फेरीला पारंपरिक महत्व आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांना याच ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा दरम्यान योगराज गहिनीनाथचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली होती. त्यानंतर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला भाविक प्रदक्षिणा मारण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.
त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा ओघ बघता एस टी महामंडळाने देखील त्रंबकेश्वर ते नाशिक 300 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच भाविकांना खासगी वाहनांचा अडथळा होऊ नये यासाठी खंबाळे येथे खासगी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.