नाशिक - मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेसचा एक कोच (डबा) रुळावरुन घसरला. इगतपुरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर आज (शनिवारी) ही घटना घडली.
इगतपुरी रेल्वे स्थानकात पुष्पक एक्सप्रेस आली असता जनरल कोच (सामान्य डबा) रुळावरून घसरला. यावेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून डब्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मुंबईकडून नाशिकच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.