नाशिक : जिल्ह्यातील सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या डी ५ सलाईनची मुदत संपण्यापूर्वीच त्याची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी उघडकीस आणला. या प्रकारामुळे सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सटाणा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सकाळी दहाला उपचारासाठी दाखल असलेल्या एका बेवारस महिलेची चौकशी करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अनिल सोनवणे, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, मनसेचे मंगेश भामरे हे विविध पक्षांचे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयात गेले होते. दरम्यान, अरविंद सोनवणे यांना १५ ते २० खोक्यांमधील डी ५ सलाईन एका ड्रममध्ये ओतली जात असल्याचे निदर्शनास आले. एका खोक्यात साधारणतः २० सलाईन असल्याने जवळपास ३०० सलाईनची विल्हेवाट लावली जात होती. हा धक्कादायक प्रकार बघून सोनवणे यांच्या सोबत असलेल्या इतर नेत्यांनी रुग्णालयात चौकशी केली. यावेळी सर्व सलाईन कालबाह्य झाल्या असून, त्यांची मुदत (एक्सपायरी) संपल्याने नेहमीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील औषधसाठा विभागाच्या प्रमुख वनवे यांनी सांगितले.
मात्र, पदाधिकाऱ्यांनी सलाईनची पाहणी केली असता त्यावर जुलै व नोव्हेंबर २०२० अखेर मुदतीची (एक्सपायरी) तारीख होती. त्यामुळे मुदत न संपताच सलाईनची विल्हेवाट लावत असल्याचे पाहून उपस्थित नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे रुग्णालयास भेट देऊन या प्रकाराची चौकशी करणार आहेत. तोपर्यंत रुग्णालयातील औषध भांडारगृहाचे दोन वॉर्ड सील करण्यात आले आहेत.
तर, औषध भांडारगृहात शासनाकडून नियमित येणाऱ्या औषध साठ्यांपैकी काही औषधांची मुदत संपते. अशी औषधे नष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. हे काम वेळोवेळी करावे लागते. त्याप्रकारे डी ५ सलाईनची मुदत संपणार होती, म्हणून त्या नष्ट करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव बांगर यांनी दिले.