नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात कोणी नाही. मात्र, तसेच करताना धर्मातील श्रद्धांवर आघात होणार नाही. याची, काळजी घ्यायला हवी. ती काळजी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात न घेतल्याने गंभीर चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्याला विरोध करण्यात येत आहे, सरकारला संयुक्त चिकित्सा समितीकडे तो अभ्यासासाठी पाठवावा लागला होता. मात्र, सरकारने त्यात मांडलेले कोणतेही आक्षेप दूर न करता (2011)मध्ये केवळ नाव बदलून, हा कायदा परत आणला आहे. त्याला महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम असे फसवे नाव देऊन तो मंजूर करण्यात आला आहे असा आरोप साधू महंतांनी केला आहे.
कायदा सर्व धर्मियांना लागू : पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुच्या विरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. नंतर हिंदु आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी वीस घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.
या विरोधात गुन्हे दाखल : नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा अथवा भुत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रीयांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकिण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे, आदी अमानुष घटनांमुळे गुन्हे नोंद झाल्याचे दिसून येत आहे, असे अंनिसने म्हटले आहे.
कायदा अधिक कडक करावा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहेत. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी डाॅ.टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे व ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.
हेही वाचा : तुमचा दाभोळकर करू.. धमकीनंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ