नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद प्रमाणे नाशकात कडक लॉकडाऊन आवश्यक आल्याचे मत नाशिकच्या डॉक्टर संघटनांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती देखील केली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 7 हजारांवर जाऊन पोहचला आहे. यात सर्वाधिक 3,500 रुग्ण नाशिक शहरातील असून मागील महिन्याभरात नाशिकमध्ये सात पटीने रुग्ण संख्या वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 341 जणांचा बळी गेला आहे. दररोज नाशकात 150 ते 200 रुग्ण कोरोना बाधित होत आहेत. परिणामी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाणे, पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर कडक लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी नाशिकच्या डॉक्टर आणि मेडिकल संघटनांनी केली आहे.
कुठल्या संघटनी केली मागणी...
नॅशनल इंटेरग्रेटेड मेडीकल असोसिएशन, मेडिकल प्रटिशनस असोसिएशन नाशिकरोड, पंचवटी मेडिकल असोसिएशन, सातपूर-अंबड डॉक्टर असोसिएशन यांनी पत्रा द्वारे नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना लॉकडाऊन लागू करण्याबाबतची मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात 40 डॉक्टर बाधित..
नाशिक जिल्ह्यातील पोलिसां पाठोपाठ कोरोना योद्धे म्हणून काम करणारे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी प्रॅक्टिस करणारे जवळपास 40 डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे डॉक्टर वर्गात सुद्धा चिंतेचे वातावरण असून सर्वच डॉक्टर ओपीडमध्ये स्वतःची काळजी घेत आहेत. कुठल्याही रुग्णांचा थेट संपर्क येऊ नये यासाठी अनेक दवाखान्यात डॉक्टर आणि रुग्णामध्ये प्लास्टिक वॉलचा वापर केला जात आहे.