नाशिक(सटाणा) - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे मालेगावात असून इतर तालुक्यातसुद्धा आता कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सटाणा शहरातील फुलेनगर (भाक्षी) येथील रहिवासी असलेले आणि सध्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे फुलेनगरचा तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी विजय भांगरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
फुलेनगरमधील पोलीस कर्मचारी मालेगावात तैनात असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. मागील ४ दिवसांपासून त्यांच्यावर नाशिक येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
एका डॉक्टरची पत्नी मुलीसह दोन दिवसांपूर्वी सटाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माहेरी आलेली होती. पतीला कोरोना संसर्ग झाल्याचे समजताच प्रशासनाने पत्नी आणि मुलीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता. डॉक्टरपाठोपाठ त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे निष्पन झाले, तर मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत आहिरराव यांनी दिली. दरम्यान कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना विलनीकरणासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.