नाशिक - गेल्या महिन्याभरापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 50 हुन अधिक मारमारीच्या घटनांची नोंद झाली आहे. ह्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून मारमारीच्या घटना वाढल्या असून पंचवटी आणि गंगापूर रोड भागात टवाळखोरांनी उच्छाद मांडला असल्याने सर्वसामान्य नागरिकात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीलागत असलेल्या आयचीतनगर ह्या भागात राहणारे नागरिक टवाळखोरांमुळे पुरते हैराण झाले आहेत. येथील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ह्या भागात रिकामटेकड्या युवकांकडून मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, उभ्या असलेल्या वाहनांवर दगड फेकून वाहनांचे नुकसान करणे, महिलांना बघून अश्लील चाळे करणे, हाणामाऱ्या करणे, रस्त्याच्या बाजूला उभे राहून मद्यप्राशन करणे अशा घटना घडत असल्याचे येथील नागरीकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी ह्या भागात गस्त वाढवावी आणि टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
चेन स्नॅचिंगच्या घटनेत मोठी वाढ
नाशिक शहरातील रस्त्यावरून जातांना महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. मागील महिन्याभरापासून नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंग घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चेन स्नॅचिंग घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उभे करत आहे. चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींवर पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा - नाशिकमध्ये वाचनालये सुरू, पहिल्याच दिवशी सार्वजनिक वाचनालयात वाचकांची गर्दी