नाशिक - महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आज झालेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर महापौरांनी निलंबन करत अधिकाऱ्याला सभागृह सोडण्याचे आदेश दिले.
नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत नाशिक पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपाचे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांच्यावर रमजान ईद दरम्यान शहरात अनधिकृत होर्डिंग लावल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
संबंधित अधिकाऱ्यांनी या होर्डिंग लावणाऱ्यांची खातरजमा न करता थेट नगरसेंवकावरच गुन्हा दाखल केला होता. यामुळे आजच्या महासभेत संबंधित नगरसेवकांनी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी केली होती. या मागणीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देत सभागृहात गोंधळ घातला लोकप्रतिनिधींच्या या गोंधळानंतर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर रंजना भानसी यांनी संबंधित अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले.
दरम्यान, नाशिक महानगरपालिकेतिल नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर अनधिकृत होर्डिंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकांनी निलंबनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. इतरवेळी महासभेत एकमेकांवर तुटून पडणारे विरोधक आणि सत्ताधारी आज मात्र सभागृहातील नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने एकत्र आले आणि प्रशासनावर तूटुन पडल्याच चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या चारही नगरसेवक सत्ताधारी भाजपचेच होते.