नाशिक : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. खरेतर बाबसाहेब म्हणजे समस्त आंबेडकरी समाजाचे तारणहार आहेत. वर्षानवर्षं जो समाज अंधारात चाचपडत होता, त्या समाजाला आपले हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. केवळ शब्दात त्याचे वर्णन करण्यात लेखणीही कमी पडू शकेल. कारण न कळण्याच्या वयापासून प्रस्थपित समाजाकडून मिळणारी वागणूक, बसलेले धक्के, या साऱ्या विरोधात संघर्ष करीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. स्वातंत्र्याची लढाई सुरू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संघर्ष सुरू होता. म्हणुनच आजमितीला अठरा पगड समाजात आज ताठ मानेने उभा आहे.
आंबेडकरी चळवळ कुठपर्यंत पोहचली : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र महामानवाने दिला. त्याचबरोबर ज्यांनी इथला देव नाकारला. तिथे मुकनायकांनी बौद्ध धर्म स्वीकारून जातीभेदाच्या विचारांना मूठ माती देत शांतीच्या मार्गावर जाणे पसंत केले. आपल्या उध्दार कर्त्याच्या या अनंत उपकाराचे ओझे मनात घेऊन आंबेडकरी समाज आयुष्य जगत आहे. बाबासाहेब होते, तिथपर्यंत ठीक होते. परंतु त्यानंतर आंबेडकरी चळवळ नेमकी कुठपर्यंत येऊन पोहोचली? समाजाची खरेच प्रगती झाली का? दैनंदिन व्यवहारात धर्माचे अस्तित्व कसे आहे? याचा आढावा घेतला असता, या मुद्द्यांवर गांभीर्याने मंथन होणे गरजेचे आहे. केवळ जयंती उत्सव साजरे करण्या इतपत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत का? त्यानंतर महामानवाने आखून दिलेल्या मार्गावर समानतेचा हा रथ कुठपर्यंत आणण्याचे काम संघटना, नेत्यांनी केले? याचे सिंहावलोकन केले तर, अनेक गोष्टी अजून अपूर्ण आहे, असे सहज जाणवते असे मत माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी व्यक्त केले आहे.
तरुण पिढी भरकटतेय :आजचा तरुण, आजचे राजकारण, स्वार्थी नेतृत्व हे मुद्दे गांभीर्याने घ्यायला हवे. अजूनही विशेषतः ग्रामीण भागातील आंबेडकरी समाज चाचपडत आहे. शहरी भागात सुध्दा भावी पिढी भरकटत चालली असल्याचे स्पष्ट जाणवते. समाजकारनाची नेमकी व्याख्या काय हेच माहीत नसल्याने, राजकारणा भोवती आजचा तरुण गुरफ्टला गेल्याचे चित्र आहे. शिक्षणाचा अभाव ही तर मोठी चिंता आहे. जगातील सर्वात मोठा विद्वान माणूस उदाहरण म्हणुन समोर असताना, शिक्षणाची गंगा कूठे आटली? याचा संदर्भ लागत नाहीं. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करताना समाजापुढे अशी अनेक आव्हाने आहेत. ते पेलण्यासाठी दुसरे आंबेडकर निर्माण होणार नाही. याची जाणीव उरी बाळगताना समाजाने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 'अत्त दीप भव..! या प्रमाणे स्वतःची, समाजाची प्रगती साधणे गरजेचे आहे, असे डॉ संजय अपरांती यांनी म्हटले आहे.