नाशिक - मुंबईत शेतकऱ्यांचा येणारा मोर्चा हा नियोजित होता, याची कल्पना राज्यपाल कार्यालयाला देखील होती. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा नाशिक हुन मुंबईत दाखल झाला. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र यावेळी शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना वेळ दिली नाही. त्यांच्या या भूमिकेवर सर्वच शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. शेतकऱ्यांचा हा मोर्चा नियोजित होता, याची माहिती सरकार आणि राज्यपाल कार्यालय या दोघांनाही होती, अशात राज्यपालांनी शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यपाल यांना अभिनेत्री कंगना रनौत यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र अनेक किलोमीटरहुन आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी देखील राज्यपालांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली.
कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ
नाशिक जिल्ह्यात मागणीपेक्षा 10 ते 12 पट ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. आता नाशिक मध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. नाशिक मध्ये लसीकरण उद्दिष्ट 75 टक्के तर, ग्रामीण भागात 82 टक्के पूर्ण झाले आहे. कोव्हिशील्ड लस साठा पुरेसा उपलब्ध आहे. तसेच लस दिलेल्यांच्या आतापर्यंत 13 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या या सर्व किरकोळ स्वरूपाच्या असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली. 5 फेब्रुवारी पासून सर्व शाळा सुरू करणार असून यासाठी आता पालकांच्या संमतीची गरज राहणार नसल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
सावरकरांच्या नावाची मागणी-
नाशिक मध्ये यंदाचे साहित्य संमेलन पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल साहित्य संमेलन समिती संमेलन भूमीचे नाव कोणते ठेवायचे? हा प्रश्न चर्चेला आला आहे. काही साहित्य प्रेमीकडून सावरकरांचे नाव ठेवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अनेक नावांचे प्रस्ताव आले आहेत त्यावर निर्णय घेऊ असेही भुजबळ म्हणाले.