नाशिक - देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे रुग्णांच्या जीवासाठी कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात येत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबद्दलची माहिती दिली.
छगन भुजबळ यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेत खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना हे वाटप करण्यात आले. सुरक्षितेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने कृतज्ञता म्हणून फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पगार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.समीर चंद्रात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या बचावासाठी खाजगी रुग्णालय सुरु ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने फेस शिल्ड मास्क तयार करण्यात आले आहे. खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला राष्ट्रवादी डॉक्टर सेल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समन्वयातून साहित्य वाटप करण्यात येत आहे. राज्यभरातील दीड लाख डॉक्टरांना फेस शिल्ड मास्कचे वाटप करण्यात येत असून याची सुरुवात नाशिक येथून करण्यात आली आहे.