नाशिक - कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडचे नियोजन करण्यात यावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. माहामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी येवला, निफाड आणि नांदगाव आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांसह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
येवल्यातील १०० टक्के कुटुंबांचं आरोग्याचे सर्वेक्षण आणि तपासणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरात १ हजार ९१६ इतर आजारांनी ग्रस्त रुग्ण सापडले असून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भुजबळ यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शहरासह ग्रामीण भागात देखील तपासण्या करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्के असून येवल्यात हे प्रमाण ७० टक्के आहे. प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वत्र चाचण्या सुरू आहेत. खासगी डॉक्टरांशी संवाद साधून या प्रक्रियेत त्यांचीही मदत घेण्यात यावी, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश त्यांनी दिले आहेत.
भुजबळ यांनी शेतकरी पीक कर्जाबाबत देखील आढावा घेतला. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कमी कर्जवाटप होत असल्याने अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून दिलेल्या उद्दिष्टा प्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच मका खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर मका खरेदी करण्यासंबंधी माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली आहे.