नाशिक - आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, हे आपल्याला माहितीच आहेच. आपल्या मुलांवर संकट येताच ती ढाल बनून त्यांच्यासमोर उभी राहते. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलांच्या जीवासाठी धडपडत असते. अशाच इगतपुरी तालुक्यातील एका आईने आपल्या लेकाचे प्राण वाचावे यासाठी बिबट्याशी झुंज दिली आणि पोटच्या गोळ्याची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली आहे.
कार्तिक घारे असे या मुलाचे नाव आहे. सात वर्षाच्या या चिमुकल्यावर घराच्या पडवीतच बिबट्याने हल्ला केला. मंगळवारी रात्रीच्या वेळेस घराच्या पडवीत खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने कार्तिकवर हल्ला केला. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरा बाहेर आलेल्या आईने बिबट्याला पळवून लावलं. त्यामुळे कार्तिकचा जीव थोडक्यात बचावला. यामध्ये कार्तिक जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये बिबट्याने हल्ला केलेली ही दुसरी घटना आहे. सोमवारी सायंकाळच्या वेळेस शेळया चारण्यासाठी गेलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. नागरिकांमध्ये आता मोठी भीती पसरली आहे. दिवसा आणि रात्री देखील घराच्या बाहेर पडणे कठीण झाल्याने विभागाने तात्काळ पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा - VIDEO : इगतपुरीच्या नागरी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार