नाशिक - शिवसेना विरुध्द केंद्रीय मंत्री नारायण राणे हा वाद अजून शमला नसून दुसर्या दिवशीही त्याचे पडसाद शहरात पहायला मिळत आहे. शिवसेना नगरसेवक अजय बोरस्ते यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधील राणेंवर टीका करणार्या अग्रलेखाचे पोस्टर शहरात लावले आहे. 'भोक पडलेला फुगा' अशा आशयाचा अग्रलेख असलेला फलक जागोजागी लावण्यात आले आहे.
पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता
शिवसेनेच्या फलक बाजीने शहरात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून फलक हटविण्यासाठी बोरस्तेना सूचना देण्यात आली. मात्र बोरस्तेकडून फलक हटविण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस बोरस्तेवर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
भोकं पडलेला फुगा...
पोस्टर लावणे हा कुठला निषेध नसून जे लोक सामना वाचत नाही त्यांना समजावे, काहींना सामनाचं दुखणं असेल त्या लोकांकरिता पोस्टर लावले आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मंत्री नारायण राणे यांना सामनाच्या अग्रलेखात त्यांची जागा दाखवून दिली आहे. ते लोकांना दिसावे म्हणूनच हे लावले गेल्याचे बोरस्ते यांनी सांगितले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. यावरून मंगळवारी संपूर्ण राज्यामध्ये तणावाचे वातावरण झाले होते आणि नाशिकमध्ये तर याबाबतचा पहिला गुन्हा दाखल झाला. हे सर्व घडत असताना बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून नारायण राणे यांच्यावरती घणाघाती हल्ला करत भोक पडलेला फुगा, नारायण नारायण हा अग्रलेख छापून आला. नाशिक मधील शिवसेनेचे महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पोस्टर करून शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये लावला.
हेही वाचा - कोंबडी पकडलेल्या वाघाचा फोटो टाकून राऊत यांचा निशाणा!
महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले की, आम्ही या पोस्टरच्या माध्यमातून यांची प्रतिमा काय आहे हे कोण? कसे आहेत? याचे चित्र लोकांसमोर मांडत आहे. याशिवाय आमचा दुसरा कोणताही उद्देश नाही. आमच्या सारखेच नारायण राणे हे शिवसेनेचे एकेकाळी कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपल्या जन्मदात्याबाबत असे शब्द बोलावे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हाच संदेश आम्ही यातून देत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.