नाशिक - कोरोना प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात मागचे शैक्षणिक वर्ष सरले आणि नवीन सुरूही झाले. मात्र, शाळा नियमित सुरू करण्याबाबत अनिश्चिता आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाइन अध्यापनाचा पर्याय निवडला आहे. सध्या शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. त्यामुळे आता नकळत्या वयातही मुलांना मोबाइल, लॅपटॉप, टॅबसारखे डिव्हाईस द्यावे लागत आहेत. मात्र, यामुळे पालकांच्या नकळत मुलं नको त्या गेम्स आणि अॅप्सकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे.
ऑनलाइन शिक्षण घेताना काही विद्यार्थी प्रामाणिकपणे उपकरणांचा वापर ऑनलाइन शिक्षणासाठी करत आहेत. मात्र, काही विद्यार्थी पालकांची दिशाभूल करत मोबाईलवर इतर अप्लिकेशन आणि गेमचा सर्रास वापर करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. पालक आपल्या मोबाइलवरून पाल्यावर कशी नजर ठेऊ शकतात याबाबत सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी माहिती सांगितली.
पालक अशी ठेऊ शकतात पाल्यांवर नजर -
प्रत्येक अॅन्ड्रॉईड मोबाईलच्या सेटिंगमध्ये डिजिटल वेलबिंग अॅन्ड पॅरेंटल कंट्रोल नावाची सुविधा असते. त्यात मुलांनी कुठल्या अॅप्लिकेशनचा वापर किती वेळ केला हे सहज कळते. सोबतच 'गुगल फॅमिली लिंक' हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यासही फायदा होतो. त्या माध्यमातून पालकांना स्वतःच्या मोबाईलमधून मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी किती वेळ (स्क्रिन टाइम) द्यायचा हे ठरवता येते. मुलांच्या मोबाईलमध्ये नको असलेले अॅप्लिकेशन आणि व्हिडिओ गेमही ब्लॉक करता येऊ शकतात, अशी माहिती तन्मय दीक्षित यांनी दिली.