नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचे आवाहन केले आहे. परंतु मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते. आमदार सुहास कांदे यांनीही मिरवणुकीत सहभागी होऊन डीजेच्या तालावर मनसोक्तपणे ठेका धरला.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाला न घाबरता शिवजयंती निमित्त मनमाड शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो शिवप्रेमी आणि सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते. या मिरवणूकीत शिवाजी महाराजांचा 25 फुट फेटा आकर्षणाचा केंद्र ठरला. गुरूवारी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती पारंपरिक पद्धतीने पार पडली. घोड्याच्या बग्गीमध्ये जिवंत देखावा करत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
हेही वाचा - हॉटेलचा वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण
मनमाड शहरातील सर्व पक्षीयांच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोनामुळे गर्दी होते की नाही अशी भीती असताना सर्व शिवप्रेमीनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून शिवजन्मोत्सव साजरा केला. शहरातील आझाद मित्र मंडळाच्यावतीने एकात्मता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 15 फुटी पुतळ्याचा देखावा करण्यात आला होता. याठिकाणी अनेकांनी येऊन दर्शन घेत सेल्फी काढले.