नाशिक- शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोदावरीसह अन्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात तब्बल 260 मिलिमीटर पाऊस झाल्याने धरण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. धरणातून 20 हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नाशिकचा सराफ बाजार या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले आहे. बाजारपेठेत अचानक शिरलेल्या पाण्यामुळे व्यवसायिकांची तारांबळ उडाली. चांदोरी-सायखेडा पूल पाण्याखाली गेल्या असल्याने तेथील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील आठ दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच गोदाकाठ परिसरात पावसाचा जोर आहे. त्यामुळे दारणा व गंगापूर तसेच इतर छोट्या धरणसमुहातून दारणा व गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. चांदोरी, सायखेडा, नागापूर, करंजगाव या गावांना पूर पाण्याचा तडाखा बसला आहे.
खालील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू...
गंगापूर धरण- 20040 क्यूसेक,
दारणा धरण- 26150 क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर धरण- 83773 क्यूसेक
भावली धरण- 1509 क्यूसेक
आळंदी धरण- 2717 क्यूसेक
पालखेड धरण- 6068 क्यूसेक