नाशिक - कळवण तालुक्यातील सावरपाडा येथे दुषित पाण्यामुळे ८७ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यात अतिसाराच्या त्रासामुळे दोन वृद्धांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा- चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता - निलेश राणे
कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सावरपाडा हे गाव येते. गावातील नागरिकांना रात्री १ वाजल्यापासून अचानक उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे. अतिसाराच्या त्रासामुळे चंद्रा तान्हु ठाकरे ( वय ७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (वय ७५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही रुग्णांवर गावातच उपचार करण्यात आले आहेत. काहींवर जयदर प्राथमिक आरोग्य केंद्रात व कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पिण्याचे पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने त्याद्वारे दुषित पाणी पुरवठा झाला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे संबंधितानी वेळीच लक्ष दिले असते, तर हा अनर्थ टळला असता.