नाशिक - मालेगाव येथील अय्युबनगरमध्ये आज (मंगळवार ता. १०) दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत अडीच वर्षाच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर मृत बालकाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.
मृत बालकाचे नाव असान मोबीन अहमद असे आहे. जखमींची नावे यास्मीनबानो मोबीन अहमद आणि मोबीन अहमद अशी आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक शेगडीने पेट घेतल्याने आग लागली. या आगीत जवळपास ५ घरांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे आणखी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरात रस्ते लहान असल्याने अग्निशमन दलाला आगीपर्यंत पोहचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत अंदाज ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
यांनी आगीवर नियंत्रण मिळवले -
अग्निशमन अधीक्षक संजय पवार, शकील अहमद, युनूस खान, रफिक खान, सागर अहिरे, तुकाराम जाधव आदी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न घेतले.