नाशिक : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सतत घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत आला आहे. कांदा भाव घसरणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीचे औचित्य साधून येवल्याच्या मातुलठाण येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन आगळे वेगळे आंदोलन केले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप : कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. मात्र, तरी देखील भावात सुधारणा झाली नाही. त्यामुळे कृष्णा डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला. शासनाने आता तरी दखल घेऊन कांद्यासोबत इतर शेतमालाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी कृष्णा डोंगरे यांनी केली आहे.
अग्निडाग समारंभाची पत्रिका: लग्नाच्या पत्रिका बघितल्या असेल मात्र कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याने चक्क कांदा अग्नीडाग समारंभ, अशी अनोखी पत्रिका छापली होती. याद्वारे राज्याचे मंत्र्यांना निमंत्रण देखील या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते. सातत्याने कोसळणाऱ्या कांदा भावामुळे शेतकरी संकटात सापडला असून सत्ता संघर्षामुळे शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या तरूण शेतकऱ्याने सरकारचे लक्ष वेधण्याकरता तसेच कांद्याला हमीभाव द्यावा, अशा विविध मागण्यांकरिता येवला तालुक्यातील मातुलठाण येथील कृष्णा डोंगरे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही अनोखी पत्रिका छापुन आशीर्वाद म्हणून भाजप सरकार, प्रमुख अतिथी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा देखील उल्लेख या पत्रिकेत केला. यामुळे अशा आगळ्यावेगळ्या पत्रिकेचा येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता.
कांद्याचे भाव घसरले : कांद्याला अनेकदा चांगला भाव मिळाल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकरी आणि गावे समृद्ध झाली आहेत. पण हाच कांदा अनेकदा शेतकऱ्यांना रडवतानाही दिसतो. राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, कांद्याला चांगला भाव मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा: VIDEO ..अन् सनी देओलला पाहून शेतकरी भारावला, बैलगाडी थांबवून हात मिळवले; पाहा व्हिडीओ