नाशिक - सोशल मीडियावरून महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या डॉक्टरला नाशिकच्या सायबर पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली. पोलिसांनी डॉक्टरचा मोबाईल ताब्यात घेतल्यावर त्याने वीस महिलांसोबत अश्लील चॅट केल्याचा प्रकार समोर आला असून, पीडित महिलांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - नाशिक : दातार जेनेटिक्स जिल्हाधिकार्यांवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार
फेब्रुवारी 2020 मध्ये नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात नाशिकरोड भागात राहणाऱ्या 38 वर्षीय पीडित महिलेने औरंगाबाद येथील डॉक्टर विरोधात अश्लील संभाषण आणि अश्लील फोटो पाठवल्याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच हा डॉक्टर आपला दवाखाना बंद करून फरार झाला होता. तब्बल 12 महिन्यांनंतर पोलिसांनी डॉक्टर अमोल जाधव याला फुलंबी औरंगाबाद येथे सापळा रचून अटक केली. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 345 (ड) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याने स्वतःचे अश्लील फोटो पाठवले
पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, मला डिसेंबर 2019 मध्ये राशी भविष्य, या व्हाॅट्स अॅप ग्रुपमध्ये कोणीतरी अॅड केले. त्यात मी माझ्या वैयक्तिक समस्या शेअर केल्या. त्यातील डॉक्टर अमोल जाधव याने मला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याने त्याच्या वैयक्तिक व्हॉट्स अॅपवरून माझ्याशी चॅट करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचे बोलणे मला पटले नसल्याने मी त्याला ब्लॉक केले. मात्र, त्याने दुसऱ्या मोबाईलवरून मला अश्लील मॅसेज आणि स्वतःचे अश्लील फोटो पाठवले.
20 महिलांशी अश्लील चॅट
महिलांबाबतचे गुन्हे सोडवण्याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी सूचना केल्यानंतर आम्ही तपासाला गती दिली. सापळा रचून डॉक्टर अमोल जाधव याला औरंगाबाद येथून अटक केली. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याने आतापर्यंत जवळपास 20 महिलांना अश्लील मॅसेज आणि अश्लील फोटो पाठवल्याचे समोर आले आहे. आम्ही या माहिलांशी संपर्क साधत असून त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, अशी विनंती करत आहोत. तसेच, या डॉक्टरची पदवी देखील तपासली जाणार असल्याचे सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सागितले.
हेही वाचा - नाशिक; एलबीटाचा हिशोब न देणाऱ्या २५ हजार व्यापाऱ्यांची खाती महापालिका गोठवणार