दिंडोरी (नाशिक)- कोरोना काळात घरातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेडगाव शाखेला टाळे ठोकल्याची माहिती समोर आली. प्रथम ठेवीदारांनी बँकेच्या संचालक मंडळाशी संपर्क साधून ठेवी परत करण्याविषयी सुचविले. परंतू संचालकांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ठेवीदारांनी टाळे ठोकले.
विनंती करुनही ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेडगाव येथील शाखेला आज ठेवीदारांनी पैसे परत मिळत नसल्याने टाळे ठोकले. कोरोनामुळे सर्वांना आर्थिक गरजा भागवण्यासाठ पैशांची गरज आहे. यामुळे गावातील अनेक ठेवीदार एकत्र आले. त्यांनी ठेवी परत करण्यासाठी शाखेतील शाखा व्यवस्थापक तसेच दिंडोरी तालुका विभागाचे व्यवस्थापक प्रधान कार्यालय, नाशिकचे प्रमुख तसेच दिंडोरी तालुका संचालक यांच्याशी अनेक दिवसापासून विनंती केली. आरटीजीएस चे फार्म भरून अनेक वेळा प्रधान कार्यालयात चकरा मारून ही ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाल्या नाही. काही ठेवीदारांच्या घरी कोरोनाचे पेशंट, काही ठेवीदारांना स्थानिक सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी तर काही ठेवीदारांच्या घरी लग्नकार्य आहे.
संचालक मंडळाने ठोस निर्णय घेतला नाही
गावातील पतसंस्था, महाविद्यालय, हायस्कुल तसेच परिसरातील अनेक गावच्या ठेवीदारांचे पैसे मिळत नव्हते. सोमवारी सर्वानी शाखेला टाळे ठोकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. यानंतर तालुका संचालक गणपतराव पाटील यांनी बराच वेळ ठेवीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रधान कार्यालय नाशिक येथील बँक व्यवस्थापक तसेच तालुका विभागीय अधिकारी यांनी ठोस असे उत्तर दिले नाही. तसेच ठेवीदारांना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवू असा धाक दाखवून शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ठेवीदारांनीही आम्ही बँकेचे सर्व संचालक कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व कर्मचारी वर्गाला बाहेर काढत बँकेला कुलूप लावले.
पुढील आठवड्यात बैठक घेऊन होणार निर्णय
हा वाद जास्तच विकोपाला जात असल्याने बँकेचे संचालक गणपतराव पाटील, खेडगावचे सरपंच दत्तात्रेय पाटील, सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेचे कार्यकारी संचालक पिंगळे व सभासद याच्याशी चर्चा केली. त्यात पुढील आठवड्यात ठेवीदारांसोबत एक बैठक घेऊन लवकरात लवकर योग्य अशी पावले उचलली जातील. लवकरात लवकर ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी ठेवीदारांनी दिले. यानंतर एक पाऊल मागे घेत ठेवीदारांनी बँकेचे कुलूप उघडले वा कामकाज सुरळीत सुरू करून दिले.
पंधरा दिवसात ठेवी परत न मिळाल्यास प्रधान कार्यालयाला ठोकणार टाळे
पुढील पंधरा दिवसाच्या आत ठेवी परत न मिळाल्यास पुन्हा एकदा कुलूप लावण्याचे आंदोलन केले जाईल. तसेच यानंतर सर्व जिल्हाभरातील ठेवीदारांना एकत्र करून प्रधान कार्यलयाला कुलूप लावले जाईल, असा ईशाराही यावेळी ठेवीदार राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर डोखळे, महेश पाटील, राष्ट्रमता इंदिरा गांधी पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण डोखले, सुनील सोनवणे, सुनील विष्णू सोनवणे, संदीप पवार, रतन बस्ते, नामदेव गवळी, दिलीप बारहाते, सुरेश सोनवणे महाविद्यालयाचे प्राचार्य हायस्कुलच्या मुख्यध्यपिका यांनी दिला.