नाशिक : श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने, आज नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल झाले असून, मंदिर परिसरात पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वातानुकूलित दर्शनरांग : ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांना वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली.ज्येष्ठांना या दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आले आहेत. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ होऊ शकणार आहे. श्रावणात दररोज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी उघडे राहील, तर प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे.
त्र्यंबकेश्वर गावकऱ्यांना विशेष वेळ : त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. सकाळी मंदिर उघडल्यापासून 10 .30 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा मात्र सोबत ठेवावा लागणार आहे. गावकऱ्यांसाठी दर्शन रांग उत्तर दरवाजातून सुरू होईल असे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले आहे.
लाडू, बिस्कीटेे, पाण्याचे मोफत वाटप : दरवर्षी श्रावण मासाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यात श्रावणी सोमवार निमित्त हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. यासाठी त्र्यंबक देवस्थान प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर राजगीऱ्याचे लाडू तसेच रांगेत बिस्कीटचे पुडे व पाण्याची बाटली मोफत दिली जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा महत्त्व : त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली जाते. मात्र गेल्या काही वर्षपासून श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही प्रदक्षिणा केल्यास अधिक फलप्राप्ती होते, अशी मान्यता पावत आहे. म्हणून जिल्ह्याभरातून लाखो भाविक या दिवशी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होतात. बहुतांश भाविक रविवारी रात्री बाराच्या नंतर कुशावर्त कुंडावर स्नान करून त्र्यंबक राजाचे दर्शन करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात करतात. 20 किलोमीटरच्या फेरीदरम्यान अनेक तीर्थे दिसतात. त्यातील बहुतेक तीर्थ आज कालाच्या ओघात लुप्त झालीत. प्रदक्षिणेचा मार्ग देखील सोयीचा ठरेल असा त्यात बदल झाला आहे. ही फेरी करताना भगवान भोलेनाथाचे नामस्मरण करत भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. या प्रदक्षिणा मार्गावर सरस्वती तीर्थ, रामतीर्थ, नागातीर्थ, निर्मल तीर्थ, प्रयाग तीर्थ आदी मंदिरात भाविक नतमस्तक होतात. तसेच डोंगर, दऱ्या निसर्गरम्य वातावरण मन प्रसन्न करते. भाविक या ठिकाणी सहकुटुंब ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यंदा एसटी महामंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वरसाठी 300 ज्यादा बसेसची व्यवस्था केली आहे. तसेच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय.
त्र्यंबकेश्वर मंदिर महत्व : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवतात. पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचे आश्रम होते. केलेल्या अपराधातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले तिथेच विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द “प्रकाशस्तंभ” दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या ज्योतिर्लिंगाची “त्रिकाल पूजा” केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून सुरू आहे.
हेही वाचा -
- Trimbakeshwar Temple news : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार
- Shravan 2023 : घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी, वाचा आणि ऐका मंदिराची अनोखी आख्यायिका
- Shravan 2023: श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात भक्तांची गर्दी, पाहा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट