मालेगाव (नाशिक) - मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीतही महिनाभरापासून कर्त्यव्यावर रुजू न होता दांडी मारणाऱ्या महानगरपालिकेच्या 33 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार यांनी याबाबत लेखी तक्रार केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... महाराष्ट्राचा वर्धापनदिन : पंतप्रधान मोदीही म्हणाले 'जय महाराष्ट्र'!
मालेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आतापर्यंत तब्बल 258 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत स्थानिक आणि जिल्हास्तरीय यंत्रणा चांगलीच जागी झाली. मागील एका महिन्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा... गडचिरोली नलक्षलवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण, महाराष्ट्र दिनच ठरला 'काळा दिवस'
दीपक कासार यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच प्रथम आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आढावा बैठकीत कोविड केअर सेंटर आणि कोरोना बाधित रुग्ण असलेल्या रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी कंत्राटी सुरक्षारक्षक कामावर येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
आयुक्त दीपक कासार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अग्निशमन दल विभागाचे विभाग प्रमुख संजय पवार यांना संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी रात्री संबंधीत कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.