नाशिक - मालेगावमधील मुस्लीम बांधवांच्या घरी जात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम बांधवांनी रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी केल्यामुळे मांढरे यांनी त्यांचे आभार मानले.
रमजानसारख्या पवित्र महिन्यातच कोरोना संकट शहरावर घोंगावत आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व नागरिक प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. या महिन्यामध्ये सर्व नागरिकांनी रमजानचे रोजे ठेवत घरातच नमाज अदा करुन एक चांगला आदर्श घालून दिला आहे. नागरिकांच्या संयमी भूमिका व स्वत:सोबत समाजाची घेण्यात आलेली काळजी यामुळेच आज मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या घटताना दिसत आहे. अशाच प्रकारे यापुढेही नागरिकांचे सहकार्य मिळेल, असे आवाहन करत शहरातील मुस्लिम बांधवांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा महापौर व आमदारांची भेट घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा...ईद-उल-फित्रनिमित्त जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख व माजी आमदार रशिद शेख यांच्यासह शहराचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांच्याही निवासस्थानी भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लाचलुचपत विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम आदी उपस्थित होते.यावेळी महापौर ताहेरा शेख म्हणाल्या की, नागरिकांच्या हाताला काम व पोटाला अन्न मिळाले पाहिजे. तर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद म्हणाले की, शहरातील नागरिक हे आजपर्यंत जकातीचा महिना असल्यामुळे तारले गेले. मात्र, यापुढे कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. यावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मालेगावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, पावरलूमच्या माध्यमातून रोजगार व शासनामार्फत अन्न धान्याचा पुरवठा करुन हे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनस्तरावरुन उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्व दिले आहे. जगभरातील आरोग्य संघटना कोरोनाला हरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यावर ठोस उपचार मिळत नाही तोवर प्रत्येकाने आरोग्य प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले असून ते यापुढेही अपेक्षीत आहे. रुग्णसंख्या ज्या प्रमाणात वाढत असली तरी त्याच प्रमाणात रुग्ण बरे होतानाही दिसत आहेत. आरोग्य सेवा, रोजगार व अन्न धान्याच्या सुविधांसाठी प्रशासनामार्फत संपूर्ण तयारी करण्यात आल्याचे सांगून शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.