नाशिक - जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नाही, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यास चार ते पाच दिवस पूर्वसूचना दिली जाईल. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, गरिब, सर्वसामान्य नागरीकांचा विचार करता लॉकडाऊन करणे संयुक्तिक ठरणार नाही. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी लोकडाऊन करणार नाही. याउलट आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिकमध्ये आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पोलीस आयुक्त चौकशी करतील -
नाशिकमध्ये बेड न मिळालेल्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात यापूर्वी संबंधितांच्या विरोधात पोलिसांमध्ये मनपाकडून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. त्याची चौकशी पोलीस आयुक्त दीपक पांड्ये करतील. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
बेडची संख्या वाढवणार -
महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रूग्ण संख्या विचारात घेता महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांमध्ये तात्काळ एक हजाराच्या क्षमतेने बेड सह इतर सुविधा निर्माण करण्यात. जिल्हा रुग्णालयातील नॉन कोविड बेडचे रूपांतर कोविड बेडमध्ये करावे. रूग्णांना जास्तीत-जास्त बेड उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना भुजबळ यांनी दिल्या.
ग्रामीण भागाकडे लक्ष द्यावे -
ग्रामीण भागातील रूग्ण संख्येमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यातील सोय म्हणून एसएमबीटी आणि एमव्हीपी ही दोन रुग्णालये शासन निर्णयानुसार तातडीने अधिग्रहीत करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट; नव्या 43 हजार 183 रुग्णांचे निदान